Tuesday, 11 February 2020

जमीन विकणाऱ्या माझ्या कोकणातील बांधवांनो जरा हे वाचा....

जमीन विकणाऱ्या माझ्या कोकणातील बांधवांनो जरा हे वाचा....

आपण  कोणी  2-4 लाख प्रति  एकर दराने जमीन विकत असाल तर त्याची प्रति चौरस फूट किंमत किती ? 

1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 33 फूट रुंद 33 फूट लांब म्हणजे 1 गुंठा. 33*33=1089 Sq. Feet म्हणजे 1 गुंठा.
अश्या प्रकारे 1089 गुणिले 40 = 43560 Sq. Feet म्हणजे 1 एकर.
बांधवांनो जर तुम्ही 2 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर  प्रति Sq. Feet ची किंमत  200000/43560= 4 रु 59 पैसे एवढी किंमत मिळते, अश्या प्रकारे 3 लाख रुपये प्रति एकर दर असेल तर 1 Sq. Feet ची किंमत 6 रु. 89 पैसे. जर 4 लाख असेल तर 9 रु.18 पैसे असा दर मिळतो.

बांधवांनो जर तुम्ही घरात असलेली रद्दी  भंगाराच्या दुकानात घेऊन गेलात तर तिला 8 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. म्हणजे आपण रद्दी पेक्षा कमी दराने जमीन विकतोय हे लक्ष्यात घ्या.

आपली स्वतःची जमीन म्हणजे मालकी हक्क. जमीन म्हणजे स्वामित्व आणि हा आपण भंगारा पेक्षा कमी दराने विकतोय.

ईश्वराने कोकणाला भरभरून निसर्ग दिलेला आहे. नदी, नाले, दरी,खोरी, भरपूर पाऊस, हिरवीगार जंगले, नितांत सुंदर समुद्र किनारे, स्वच्छ हवा एवढी निसर्ग संपदा असून सुद्धा आपण जमीन पडीक आहे, उत्पन्न काही नाही म्हणून विकून टाकतो हा आपला नाकर्ते पणा आहे.
आज कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.शेडनेट, पॉलिहाऊस उभारून 10 ते 20 गुंठ्या मध्ये सुद्धा 2 आणि 3 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. आणि आम्ही चार भावांचे पटत नाही. भावांच्या बायका हे झाड माझ्यात आणि हे झाड तुझ्यात अश्या भांडतात म्हणून जमीन विकतोय हा शुद्ध मूर्खपणा आहे.
आणि जर तुम्हाला कोणी दलाल काही सांगत असेल तर त्याचे मुळीच ऐकू नका कारण हे दलाल म्हणजे दोघांचे भाडं आणि तिसऱ्याचा लाभ उठवणारे माकड असतात. जसे दोन मांजरीचं लोण्याचा गोळ्या वरून भांडण होते आणि त्याचा फायदा माकड उठवतो.
म्हणून आपसात न भांडता शांत पणे सर्व भाऊ एकत्र बसून तिरसट पणे एकमेकांशी न बोलता व माथेफिरू सारखा न विचार करता शांतपणे, थोडा समजूतदारपणा दाखवून  थोडासा खर्च करून जमिनीचे विभाजन करून घ्यावे आणि भले पाच-दहा गुंठे का असेना आपल्या मुलांसाठी ठेऊन द्यावी.

आपणास माहीत आहेच की गोवा हायवे चे चौपदरीकरण पुढील 5-10 वर्षात पूर्ण होईल. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण पुढील 15-20 वर्षात पूर्ण होईल. सागरी महामार्ग पुढील 10-15 वर्षात पूर्ण होईल मग आपल्या मुलाबाळांना एखादा उद्योग, व्यवसाय, एखादा नवीन प्रयोग करावासा वाटला तर जमीन कुठून आणणार.
मग भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीची आठवण येईल पण जमीन परत मिळणार नाही. एकदा जमीन विकली की ती हातातून गेली.

अजून एक मुद्दा आज सोलर पॉवर वर मोठमोठ्या कंपन्या संशोधन करत आहेत. आज लाख रुपयांना मिळणारे सोलर पंप काही  वर्षांनी 10-20 हजारात मिळतील मग प्रत्येक जमिनीमध्ये सोलर पंप लागेल.
अश्या प्रकारे आपण भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीमध्ये काहीतरी चांगले करून तिथे सोने पिकवता येईल.
म्हणून भंगाराच्या भावाने जमीन विकताना दहा वेळा विचार.

No comments:

Post a Comment