कोकणातील शिमगोत्सव.........
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।
हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.
होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.
त्यानंतर तिसर्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .
त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.
शिमगा म्हणजे होळी सणाच्या अगोदर १० दिवस छोट्या शेवरीच्या होळ्या जाळण्याची प्रथा आहे . फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक-पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत रोज वाडीतील मुले संध्याकाळी होळी उभी करतात ,मग रात्री ११ च्या दरम्याने गवत /लाकडे चोरून आणायची आणि रात्री १ च्या दरम्याने होळी जाळायची ,असा हा कार्यक्रम असतो … यावेळी "डीन्गा पाणी " नावाचा खेळ रात्रीच्या चांदण्यात खेळला जातो, तसेच कोणाची उन्हाळी शेती असेल तर तिथून काकड्या/ कलिंगड आणि आंबे/काजू फणस चोरून आणले जातात आणि ते खाउन मग होळी जाळतात
तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !
आमच्या गावच गार्हाण ....
व्हssssssय म्हाराजा !
जय देवा धोपेश्वरा, लक्ष्मीनारायणा, महापुरुषा, बारा गावच्या, बारा वाडीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा,
व्हय म्हाराजा .....
मी जे काय कार्य योजलेलो असा, जो काय खेळ मांडलेलो असा म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तो नीटपणे तडीस जाऊ दे रे म्हाराजा .....
व्हय म्हाराजा ......
जर काय कोणी वाईट मनाने चालगत, चेटूक बिटूक, करणी बिरणी केली असेल म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तर त्याचे दात त्याच्या घशात घाल रे म्हाराजा
व्हय म्हाराजा ......
वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा
व्हssssssssय म्हाराजा
आणि माझे जे कोण मित्र, मैत्रिणी, त्या सर्वांका सुखी ठ्येव रे म्हाराजा
व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!
No comments:
Post a Comment