शास्त्रज्ञांची चरित्रं या विषयावर मराठीत खूप कमी लोकांनी लिहीलेलं आहे. बाराला दहा कमी या पुस्तकाचे ऋण मानायला हवेत की त्यात महत्वाच्या अणूशास्त्रज्ञांची ओळख करून दिलेली आहे. वीणा गवाणकरांनी दोन शास्त्रज्ञांची चरित्रे लिहीली. पैकी कार्व्हरला खूप प्रसिद्धी मिळाली. लीझ माइटनरचे चरित्र वेगळ्या वाटेचे आहे. रोझलिंड फ्रॅंकलिनचे चरित्रही महत्वाचे आहे. हे प्रयत्न खूप तोकडे आहेत. आपल्याकडे जेव्हड्या साहीत्यिक आणि राजकीय गप्पा चालतात तेव्हड्या वैज्ञानिक दृष्टीकोणाबद्दल चालत नाहीत. वैज्ञानिक दृष्टीकोण हा केवळ विज्ञानविषयक शोध लावण्यासाठी नसून एकूणच आपल्या जगण्याच्या दृष्टीकोणात फरक आणण्यासाठी आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोणासाठी शास्त्रज्ञांची चरित्रे, त्यांचे विचार हे सर्व वाचले गेले पाहीजे. किती दिवस आपली पिढी श्रीमान योगीतल्या तख्तपोशींची वर्णने वाचणार आहे ? वैज्ञानिक दृष्टिकोणाचा परिणाम विचारसरणीवर होतो. मूल रॅशनल थिंकींगकडे वळत जाते. माणूस जितका रॅशनल होत जातो तितका तो नास्तिककडे झुकतो आणि त्याच वेळी माणुसकीनेही वागू लागतो. देवादिकांच्या भयाने माणुसकी ही कल्पना थोतांड आहे हे पटण्यासाठी त्याला योग्य ते एक्स्पोझर मिळायला हवे असते. आपल्या समाजात नेमक्या याच गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असताना आपण मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून हनुमान कसा उडतो हे दाखवत राहतो.
अर्नेस्ट रुदरफर्ड हा न्युझीलंडमधल्या शेतमजुराचा मुलगा. परिस्थितीने त्याला प्रयोग करायला शिकवलं. न्युझीलंड हा काही विकसित देश नाही. पण वैज्ञानिक दृष्टीकोणाचा अभाव नक्कीच नाही. त्याची आई विज्ञान शिकवायची. अर्नेस्टला गरिबीमुळे गुरं वळण्याचंही काम करावं लागलं. पण जेव्हां संधी मिळे तेव्हां त्याने केलेले उद्योग थक्क करणारे असत. त्याच्या या धडपडींमुळे त्याला नेहमी स्कॉलरशिप मिळत राहिली. जेव्हां तो केंब्रिजमधे दाखल झाला तेव्हां त्याच्या गुणांना संधी मिळाली. त्याच्या प्रयोगशील स्वभावाला मोकळीक मिळाली. एक्स्पोझर मिळालं आणि त्याने जगाला न्युक्लियर फिजिक्स दिलं. अणूचं मॉडेल दिलं. बोरसारखा तीक्षण बुद्धीचा विद्यार्थी त्याला लाभला.
कार्व्हरच्या बाबतीतही खूप गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीतूनही जेव्हां त्याला संधी मिळाली तेव्हां त्याला प्रयोग करता आले. एक शास्त्रज्ञ जन्माला आला.
ही दोन उदाहरणं अत्यंत बोलकी आहेत. परिस्थिती वाईट असते. पण तिच्यावर मात करून संधी मिळाली तर मनुष्य काय करू शकत नाही ? रुदरफर्डला संशोधनाची संधी मिळाली. कार्व्हरला संधी मिळाली. त्यामुळे पूर्वायुष्यातील परिस्थितीने शिकवलेल्या पाठाचा उपयोग करून मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेता आला.
आपल्याकडे असे कित्येक रुदरफर्ड , कार्व्हर असतील. पण त्यांच्या वाटेला प्रयोगशाळा येतच नाहीत. शाळेत पंचवीस मुलांना गुरुजी प्रयोग करून दाखवतात. पुढच्या मुलांना दिसला , मागच्यांना नाही दिसला तरी पुन्हा रिपीट टेलिकास्ट नाही. त्या मुलांना पुस्तकातले पाठ करून पेपर लिहीण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. मुळात प्रयोग कशासाठी याचं ज्ञान ना शिक्षकांना, ना शिक्षणखात्याला ना विद्यार्थ्यांना. कोवळ्या वयातली जिज्ञासा मारण्याचे काम आपले शिक्षण करतं. कॉलेजलाही हीच परिस्थिती आणि इंजिनियरिंगलाही. आणि अपेक्षा मारे स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॊजी आणण्याच्या.
ज्या कंपन्यांनी भारतातली ही परिस्थिती ओळखून रिसर्च सेंटर्स,क्रिएटिव्हिटी सेंटर्स उभारले आणि नव्या अभियंत्यांना पूर्ण सुविधा दिल्या त्याचा त्यांना नक्कीच फायदा झाला. एसकेएफ , थर्मॆक्स अशा काही कंपन्यातली ही उर्जा केंद्र प्रभावी वाटली. पण हेच शालेय पातळीवर का होऊ शकत नाही हे कोडे उलगडत नाही.
परदेशातल्या मित्रांना विचारतो तेव्हां ते सांगतात की रात्री बारा वाजता जरी एखाद्याला प्रयोग करावासा वाटला तरी त्याला त्याची मुभा असते. जोपर्यंत एखाद्याला एखादी गोष्ट नीट समजत नाही तोपर्यंत त्याला प्रयोग करून पाहता येतात. आपल्याकडच्या काही शाळांमधे तर प्रयोगशाळाच नसते. भयाण आहे हे ...
मग या देशात शोध लागणार कसे ? टेक्नॉलॉजी विकसित होणार कशी ? आणि महत्वाचे म्हणजे अशीच उदासीनता राहीली तर वैज्ञानिक दृष्टीकोण तरी कसा विकसित होणार ? मोठं दुष्टचक्र आहे. वै. दृ. अभावी अंधश्रद्धा, बुवाबाजी, खुळचटपणा, जातीयवाद यांचं पीक आलंय. यात जनता आकंठ बुडाली आणि ती तशीच बुडालेली राहील्याने राजकारण छान चालतं. ते तसं चालतं म्हणून मुठभर रॅशनलिस्ट लोकांना उसासे सोडता येतात.
पण एकंदरीतच दुष्टचक्र भेदून मूलगामी काम होताना दिसत नाही. तोपर्यंत चालू द्या !
No comments:
Post a Comment