अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त् यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची...
घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक...! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय सहाच गोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला... शिवाय काचही फुटलेली त्याची...! गेल्या 25 वर्षात त्याला परत काच लागली नाही...!
तो काळ ही तसाच होता... अण्णा शिक्षक... त्याकाळी पगार कितकासा राहणार? त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी..!
घरखर्च, पाच जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...
म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. अण्णांचा पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!
*कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी...*
नकळत डबोल मिळायचं मला तिचं.... _'कुणाला सांगणार नाही'_ म्हणून किरकोळ कमिशन घ्यायचो मी..! पण ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!
एकदा टेपरेकॉर्डर चा external speaker box टराटरा आवाज काढायला लागला... कालपर्यंत चांगला वाजणारा बॉक्स असा काय वाजतोय म्हणुन वर चढून काढला दुरुस्तीला... घरातल्या घरात दुरुस्तीचे उपाय म्हणुन घेतला उघडायला... मागे कव्हरला वरून बोटभर गॅप होता त्याला...
*चारही कोपऱ्यातले स्क्रू काढल्यावर कव्हर अलगद काढले नि आत मध्ये प्लॅस्टिक हिरव्या पिशवीत कसलीशी पुरचुंडी दिसली... गुंडाळलेली...!*
*पिशवी उघडली... त्यात शंभर... पन्नास... वीस... दहाच्या नोटा एकमेकांत गुंडाळुन मस्त आराम करत होत्या...! हजार पंधराशे सहज असतील... अल्लाउद्दीनचा खजाना लागला जसा हातात...!*
आई बघत होती... म्हटली, _"आण इकडे...!"_ पन्नास रुपये कमिशन वर दिले परत अण्णांना न सांगण्याच्या बोलीवर...! नंतर त्याच पैशाचा घरातला पहिला सिलिंग दिल्ली मेड फॅन फिटिंग चार्ज सहित तीने बसवला... त्याआधी मुंडी इकडून तिकडं हलवणारा टेबलफॅन च असायचा..!
चाळीतलं घर म्हणजे एकेकाळी विडीउद्योगाचं ऑफिस होतं... स्वयंपाक घरात एका बाजूला कप्पेच कप्पे; एका वर एक कौलापर्यंत एकमेकांच्या बाजूला... भिंतीत बनवलेले... भिंतच जवळ जवळ दीड फूट जाडीची...!
जवळ जवळ वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या वस्तू सहज बसायच्या त्यात... त्यातल्या एका वरच्या कप्यात सहा सात फुटावर पाहुणा गणपती ठेवलेला असायचा... म्हणजे गणपती वर्षभर जपून ठेवायचा.. पुढल्या गणपती सोबत बसवायचा आणि मागच्या वर्षाचा गणपती मग विसर्जित करून नवीन आणलेला गणपती पुढं वर्षभर ठेवायचा...! प्रथाच आहे ती घरातली...!
बोटांना परत वळवळ आली... म्हटलं धूळ साचलीय तर पुसून घ्यावा... वर चढलो... काढला तो गणपती... साफ करायला फडकं घेतलं... प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खालून पोकळ असलेला गणपती तो... उलटा केला तर परत प्लॅस्टिकची पुरचुंडी...!
देवानं दान दिलं परत...! आईनं धपाटा टाकला... म्हटली _"कुठं कुठं हात पोहोचतात तुझे...!"_ कमिशन बेसिस वर परत मिळाले तीला...! पुढे डमरू सारखा नवीन टेपरेकॉर्डर घ्यायला तिनेच ते पैसे दिले होते..!
पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तिने साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...!
ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...!
वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता...
वडील रिटायर्ड झाल्यावर वडिलांनी हौसेनं केलेल्या बांगड्या बहिणीच्या लग्नात सरळ मोडायला देऊन टाकल्या...!
मुलगा झाला त्यावेळी मला अकरा हजार साचवलेले घेऊन आली द्यायला...!
वडील अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..!
वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...!
तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...!"_
व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...!
_'आई..._
_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे नऊशे रुपये तसेच ठेवलेत ग डब्यात तुझ्या...! दहा रुपयाचे खूप सारे कॉइनही तसेच राहू दिलेत लक्ष्मीपूजनाचे...! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! डब्याला कुलुपही तसंच आहे... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...! कमिशन नकोय ग मला...!'_
अक्काचा एक मित्र बोलता बोलता खूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."
छान सुचवून गेला तो...!
आई, तू आजही हे लिहिताना
तू तशीच उभी राहिलीस समोर...!
आई मग ती आधुनिक असो की आपल्या वेळची असो. आई म्हणजे आईचं असते सर्वांची सारखीच असते.✍
#Cp
लेखक अज्ञात... 🙏
No comments:
Post a Comment