Saturday, 22 July 2023

सकारात्मकता

वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढ शिकायला मिळत की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते.

साखर जरी गोड असली तरी ती विरघळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरघळतं, आयुष्य हे असचं आहे.

गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडस थांबावं लागत, पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात.

चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.

शंकेला ईलाज नाही,स्वभावाला औषध नाही,चरित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारख उत्तम साधन नाही.

आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते. तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची आपली संगत आपले भविष्य घडवते.

 तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर, ते देवाच्या चरणी पोहचतात. पण जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे.

मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असेना. पण तिथे घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ नाहीतर सगळं व्यर्थ एकदाच जन्म, एकदाच मरण येणार उघडा, जाणार उघडा. माझं माझं करू नये, इथे काहीच नाही आपले मनमोकळं जगा.

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनले जात.

शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो.

संबंध चांगले असतात तोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते मात्र संबंध बिघडल्यावर तुमच्या चांगल्या गोष्टीवर सुध्दा शंका घेतली जाते.

स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे. जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी म्हणुन पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे.

Wednesday, 23 November 2022

आईची तिजोरी...!

अण्णांचा पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम अण्णा आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त् यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शीलकी रहायची ती आई बचत करून ठेवायची... 

घरात एक गोदरेज कपाट सार्वजनिक...! आई अण्णा.. आम्ही पाच भावंडे असे सगळे मिळुन सात जणांमध्ये ते बिचारं तीन बाय सहाच गोदरेजचं लोखंडी कपाट स्वतःहून समर्पित झालेलं असायचं आम्हाला... शिवाय काचही फुटलेली त्याची...! गेल्या 25 वर्षात त्याला परत काच लागली नाही...! 

तो काळ ही तसाच होता... अण्णा शिक्षक... त्याकाळी पगार कितकासा राहणार?  त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा होता शिक्षकी..! 

घरखर्च, पाच जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...

म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. अण्णांचा पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...! 

*कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये  म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी...*
नकळत डबोल मिळायचं मला तिचं.... _'कुणाला सांगणार नाही'_ म्हणून किरकोळ कमिशन घ्यायचो मी..! पण ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!

एकदा टेपरेकॉर्डर चा external speaker box टराटरा आवाज काढायला लागला... कालपर्यंत चांगला वाजणारा बॉक्स असा काय वाजतोय म्हणुन वर चढून काढला दुरुस्तीला... घरातल्या घरात दुरुस्तीचे उपाय म्हणुन घेतला उघडायला... मागे कव्हरला वरून बोटभर गॅप होता त्याला... 

*चारही कोपऱ्यातले स्क्रू काढल्यावर कव्हर अलगद काढले नि आत मध्ये प्लॅस्टिक हिरव्या पिशवीत कसलीशी पुरचुंडी दिसली... गुंडाळलेली...!* 

*पिशवी उघडली... त्यात शंभर... पन्नास... वीस... दहाच्या नोटा एकमेकांत गुंडाळुन मस्त आराम करत होत्या...! हजार पंधराशे सहज असतील... अल्लाउद्दीनचा खजाना लागला जसा हातात...!*

आई बघत होती... म्हटली, _"आण इकडे...!"_ पन्नास रुपये कमिशन वर दिले परत अण्णांना न सांगण्याच्या बोलीवर...! नंतर त्याच पैशाचा घरातला पहिला सिलिंग दिल्ली मेड फॅन फिटिंग चार्ज सहित तीने बसवला... त्याआधी मुंडी इकडून तिकडं हलवणारा टेबलफॅन च असायचा..!

चाळीतलं घर म्हणजे एकेकाळी विडीउद्योगाचं ऑफिस होतं... स्वयंपाक घरात एका बाजूला कप्पेच कप्पे; एका वर एक कौलापर्यंत एकमेकांच्या बाजूला... भिंतीत बनवलेले... भिंतच जवळ जवळ दीड फूट जाडीची...! 

जवळ जवळ वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या वस्तू सहज बसायच्या त्यात... त्यातल्या एका वरच्या कप्यात सहा सात फुटावर पाहुणा गणपती ठेवलेला असायचा... म्हणजे गणपती वर्षभर जपून ठेवायचा..  पुढल्या गणपती सोबत बसवायचा आणि मागच्या वर्षाचा गणपती मग विसर्जित करून नवीन आणलेला गणपती पुढं वर्षभर ठेवायचा...! प्रथाच आहे ती घरातली...! 

बोटांना परत वळवळ आली... म्हटलं धूळ साचलीय तर पुसून घ्यावा... वर चढलो... काढला तो गणपती... साफ करायला फडकं घेतलं... प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खालून पोकळ असलेला गणपती तो... उलटा केला तर परत प्लॅस्टिकची पुरचुंडी...! 

देवानं दान दिलं परत...! आईनं धपाटा टाकला... म्हटली _"कुठं कुठं हात पोहोचतात तुझे...!"_ कमिशन बेसिस वर परत मिळाले तीला...! पुढे डमरू सारखा नवीन टेपरेकॉर्डर घ्यायला तिनेच ते पैसे दिले होते..! 

पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तिने साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...! 

ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...! 

वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता... 

वडील रिटायर्ड झाल्यावर वडिलांनी हौसेनं केलेल्या बांगड्या बहिणीच्या लग्नात सरळ मोडायला देऊन टाकल्या...! 

मुलगा झाला त्यावेळी मला अकरा हजार साचवलेले घेऊन आली द्यायला...!

वडील अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..! 

वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...! 

तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...!"_ 

व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...! 

_'आई..._ 

_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे नऊशे रुपये तसेच ठेवलेत ग डब्यात तुझ्या...! दहा रुपयाचे खूप सारे कॉइनही तसेच राहू दिलेत लक्ष्मीपूजनाचे...! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! डब्याला कुलुपही तसंच आहे... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...! कमिशन नकोय ग मला...!'_

अक्काचा एक मित्र बोलता बोलता खूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."

छान सुचवून गेला तो...! 

आई, तू आजही हे लिहिताना 
तू तशीच उभी राहिलीस समोर...!
       
आई मग ती आधुनिक असो की आपल्या वेळची असो. आई म्हणजे आईचं असते सर्वांची सारखीच असते.✍

 #Cp

लेखक अज्ञात... 🙏

Sunday, 20 November 2022

एक निडणुक - काल्फनिक


======================

काय सुभाण्या आज उशीर का झालं र ? आम्ही कवा धरणा इथ पारावर तूझी वाट बगतोय.
काय नाय सोम्या, लेक गेलाय शहारा कड, नातू कॉलेजात आणि नात शाळला. आज लेक बाहेर हाय म्हणूनच्यान सून गेली गुराकड, गुर तटात लावलान आणि  आली घाई-घाईन घरी,
मला आपली भाकरी भाजून दिलान, मी खाल्ली आणि वाटला लागलो.

सुभान बाबांनच उत्तर ऐकून, सोमनाथ बाबा बोलले,
"बरं म्हणज भाकरीला उशीर झाला म्हणायचा, असना आलास हा बरा केलास"

मी आज सकाळीच गावी पोचलो होतो, थोडासा आराम करून, गावच्या पारावर पोचलो. थंडीचे दिवस नुकतच सुरू झाले होते, बोललो थोडा कोवळ उन घेऊ आणि त्या बरोबर पारावर बसून गावच्या जुन्या जाणत्या लोकांच्या गप्पा ऐकू.

सर्व जण उन घेण्यात मग्न होते, मी विचारपुस करावी म्हणून, काय बाबा काय म्हणताय, तबीयत काय बोलतेय सर्वांची ?
सुभान बाबा बोलले, एकदम ठण-ठणीत, ७७ वर्षाचा झालो, खाल्लेलं पचतय, झोप चांगली लागतेतय, स्वतःच सर्व स्वतः करतोय, अजून काय हवं ?
देवानं आता पर्यंत आम्हाला सर्व भर-भरून दिलं फक्त असाच न्याव , उगाच अथरूनावर पडून राहण्याची वेळ येऊ न द्यावी हीच एक शेवटची इच्छा.
नाय, तसा पोरा-बाळा करतील हो शेवटी पर्यंत, त्यात काय वाद नाय, पण हयात मेहनतीनं सर्व उभा करण्यात गेली , कुणाला कसला ताप दिला नाही, उगाच जाता जाता कुणाला त्रास नको.
मालकीण गेली २ वर्षा पूर्वी , आता कधिबी बुलावा येऊदे , मी तयार आहे.
काय र सोम्या ? 
हो - हो मी पण, जाऊ  झो सोबत, बघू झो वर्ती काय वाडलेला आहे तो.
आणि सुभाण्या झो गेल्या गेल्या बघू अबू आणि खाश्या काय करत असतील ते ?  😃 सोमनाथ बाबा बोलले.

आमच्या बाजूला अजून थोडी वयस्कर मंडळी होती, वयानी ह्या दोन्ही पेक्ष्या थोडी लहान होतो, सोमनाथ बाबा बोलतच सर्व हसायला लागले.
अबू आणि खाश्या हे या दोघांचे अगदी खास जोडीदार, दोघेही २ वर्षा-पूर्वी देवाघरी गेले होते. त्या वर सुभान बाबा दुसरा विनोद नाय करतील तर कशाला हवा ?  बाबा बोलले अबू लोकांची नारली चोरीत असल आणि खाश्या काजू चोरीत असल. मेले आपल्या आधी गेलं आहेत वर , वाईच झाडा-माडा लावतील तर कशाला हवाय ?
सोमनाथ बाबन च ह्या वर उत्तर मेल्यानी इथ जमनिवर काय लागवड केलिन नाय बा त वर ढगात करतायत, मेल ?
पुन्हा एकदा मोठा हास्य 😃

आयुष्यभर संघर्ष केलेली ही मंडळी , मेहनतीने मिलेल त्यात आणि थोडक्यात समाधान मांननारी ही पिढी . मृत्यू सारख्या गंभीर विषयाला पण कधी भाव नाही दिला यांनी, त्याचाही विनोद करून मोकळे.

थोड्या इकडच्या - तिकडच्या  गप्पा झाल्या मग मी म्हणालो काय बाबा ग्रामपंचायत काय बोलतेय ? निवडणुका आल्यात ? काय तयारी आहे की नाही.
सुभान बाबा बोलले, आता आम्ही र काय निवडणुका लढवणार ? आमचा वय झालं आहे , आणि तस बोलशील तर मी एकदा सरपंच झालोय बा, सोम्या तुझी इच्छा राहिली आहे, माझ्या बरोबर हरला होतास निडणुकित ,
आता उभा रहा, मी तुझ्या विरोधात नाय , तुला पाठिंबा देतो आता 😃
नंतर परत बोलले, नको-नको तू मधिच मेला- बिलास तर परत निवडणूक लागायची, सरकारला परत खर्च नको.
मेलास तू माझ्या मरनावर का आहेस , तुझ १२ व्या च लाडू खाल्ल्या शिवाय मी जाणार नाय, आणि तसा पण तू bonus चा आयुष्य जगतो आहे, जय तर निवडणुकीच्या वेळेस खाश्या च्या हातून मेला असतात, तुझा अबू खाश्याला भिडला म्हणून तु वाचलास, सोम्या बाबा नी पलटवार केला 😃

थोड अजून त्यांच्याबरोबर बोललो तेव्हा समजलं की हे ३५-४० वर्षी एक मेकानच्या विरोधात निवडणुका लढले आहेत, निडणुकांपूर्वी चे खास मित्र समोरा समोर आले, मनात गैरसमज निर्माण झाला आणि बघता-बघता, राजकारण तापलं, संघर्ष शिगेला पोचला, बालपणीचे लंगोटी मित्र दुभागले गेले, अबू एकाच्या बाजूंनी आणि खाश्या दुसऱ्याच्या, परिनामी पूर्ण गाव ढवळून निघाल, काहीच्या घरात भावंडं एक मेकात बोलेनाशी झाली. कारण काय तर गैरसमज आणि त्यामुळे दूषित झालेला राजकारण.

अटी-तटी ची लढत झाली, त्यात कस बस सुभान बाबानच पॅनल निवडून आला आणि बाबा सरपंच झाले, 
सुभान बाबा बोलले, निवडून आल्यावर खरी भीती वाटत होती, कारण गाठीशी कसला अनुभव नव्हता त्यात हा सोम्या जोरात निडणुक लढउन सुद्धा हरलेला, बर बर्यापिकी लोक त्याच्याही पाठीशी उभी होती, बोललो आता काय आपला खर नाही ही सर्व लोक आपल्याला वेळोवेळी जाब विचारणार, निडणुकित केल्याल्या आश्वासनांचा पाठ पुरावा करणार. 
पण मी वाचलो, येवढ्या जोश मध्ये निडणुक लढणारे आणि आम्हा दोघांच्या तितक्याच जोशाने पाठीशी असणार गाव, आम्ही काय काम केलं ?, किंव्हा अजून काय काम करणार ? आश्वासन पूर्ण करणार की नाही, असा एकानिही सवाल जवाब पाच वर्षात केला नाही. 

बाबा म्हणाले त्यातल्या त्यात आम्हीही काही कामे पूर्ण केली, काही काम पुर्ण झाली नाहीत पण प्रामाणिक प्रयत्न मात्र केला होता.

शेवटी २ घे ही बोलले , मनात निर्माण झालेलं कटुता विसरण्या साठी पुढील १०-१५ वर्षी गेली आणि पुन्हा आम्ही दोस्त झालो 😊

असो शेवट गोड, तर सर्वच गोड  😊

टीप - वरील लेख हा काल्पनिक आहे, त्याच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही आहे, जर चुकून सबंध अढळल्यास तो केवळ एक योग - योग मानावा 🙏

फोटो - नेटसाभार

#वाटसरू
#काल्पनिक

Tuesday, 24 May 2022

जगायचं कुणासाठी...?

✍️जगायचं कुणासाठी...?

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य  जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी  80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त 10/15 दिवसांपुरतीच असते...  कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं.. 

 *सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य* *वाचावा धन्यवाद* .  मग...जगावं तरी कुणासाठी? ..

तर...जगावं तर ते समाजासाठी...  तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय... 

*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो.  पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*. 

आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर  संत  गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे...  *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*

आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने 

*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* 
ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप  काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...

बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....

*समाजासाठी जगा...*
*दान-धर्म करा, योग प्राणायम करा,ध्यान धारणा करा,भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे.👏

Friday, 6 May 2022

ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय?

"ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय?"

   " विदेशी झाडे का नकोत ?"

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.

दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला. 

आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो, पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही. कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली. 

अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत. 

या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे. 

एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय, बैल, शेळीसुद्धा खात नाहीत. 

माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की, परदेशी झाडे घातक आहे ते. आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. *या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत.

ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या, तरी ते अपंग होतात, मरतात. या झाडाखालुन चालताना धाप लागते. या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते. जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत. 

१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली, तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले, तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे. 

फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही. जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत, तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे 😊संशोधनावरुन सिध्द झालेले आहे.

इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत. आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की, कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो. यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे. 

आता देशी झाडेच का लावायची ? 

याबद्दल अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्। 

"अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही." हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे.

वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो.

देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे.

देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते. 

यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते. मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...? ? ?

पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही.

Tuesday, 12 April 2022

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? जाणून घ्या कारणं

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. 
त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'
प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही, हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.
एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा कि...
रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते...तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते...माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत...आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत...
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा...कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभ असतं...!                                           
"माझं चुकलं?...
हे शब्द समोरच्याचा काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं"...हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धींगत होवो हीच सदिच्छा...

सुरक्षित राहा व काळजी घ्या......

Friday, 4 March 2022

कोकणातील शिमगोत्सव.........

कोकणातील शिमगोत्सव.........
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

शिमगा म्हणजे होळी सणाच्या अगोदर १० दिवस छोट्या शेवरीच्या होळ्या जाळण्याची प्रथा आहे . फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक-पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत रोज वाडीतील मुले संध्याकाळी होळी उभी करतात ,मग रात्री ११ च्या दरम्याने गवत /लाकडे चोरून आणायची आणि रात्री १ च्या दरम्याने होळी जाळायची ,असा हा कार्यक्रम असतो … यावेळी "डीन्गा पाणी " नावाचा खेळ रात्रीच्या चांदण्यात खेळला जातो, तसेच कोणाची उन्हाळी शेती असेल तर तिथून काकड्या/ कलिंगड आणि आंबे/काजू फणस चोरून आणले जातात आणि ते खाउन मग होळी जाळतात

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

आमच्या गावच गार्‍हाण ....

व्हssssssय म्हाराजा !

जय देवा धोपेश्वरा, लक्ष्मीनारायणा, महापुरुषा, बारा गावच्या, बारा वाडीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा,
व्हय म्हाराजा .....
मी जे काय कार्य योजलेलो असा, जो काय खेळ मांडलेलो असा म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तो नीटपणे तडीस जाऊ दे रे म्हाराजा .....
व्हय म्हाराजा ......
जर काय कोणी वाईट मनाने चालगत, चेटूक बिटूक, करणी बिरणी केली असेल म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तर त्याचे दात त्याच्या घशात घाल रे म्हाराजा
व्हय म्हाराजा ......
वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा
व्हssssssssय म्हाराजा
आणि माझे जे कोण मित्र, मैत्रिणी,  त्या सर्वांका सुखी ठ्येव रे म्हाराजा
व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!